मुलींच्या विनयभंग प्रकरणी संस्थाध्यक्षाला अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संस्था अध्यक्षाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. नयन गणेश मुळे असे संशयिताचे नाव आहे. शिक्षण संस्थेत मुलींबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार संस्थेत काम करणाऱ्या महिलेने पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नयन मुळे यांना मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संगमेश्वर येथील संबंधित वसतिगृह हे परवानगी नसताना चालवले जात असल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी असलेल्या मुलींबाबत गैरप्रकार होत आहे, अशी तक्रार या वसतिगृहातील महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्रथम रत्नागिरी शहर पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर प्रकरण संगमेश्वर येथील असल्याने हा गुन्हा संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाकामी नयन मुळे यांना अटक केली होती. या प्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.