वाहन चालकांचा आरोप; आंदोलनाचा पवित्रा
रत्नागिरी:- रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आंबा घाट हा अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला तरी हा मार्ग वाहनांसाठी मोकळा करण्यात आला नाही. सध्या केवळ हलक्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मुर्शी साखरपा येथे पोलिस चेक पोस्ट येथे सहाचाकी वाहने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जाण्यास पोलिसांकडून अटकाव केला जातो. मात्र, स्थानिक वाहनधारकामार्फत रात्रीच्या दरम्यान पैसे घेऊन काही वाहने सोडण्यात येतात, असा आरोप करण्यात येत आहे.
तसेच आंबा घाट येथे घाट वाहतुकीस बंद असल्याबाबत सूचना देणारे माहिती फलक किंवा कोणीही पोलीस कर्मचारी तैनात केलेला नाही. यामुळे बाहेरील मोठ मोठी अवजड वाहने थेट मुर्शी साखरप्या पर्यंत बिनदिक्कतपणे येतात. साखरपा येथे घाटातून आलेल्या वाहनांवर केवळ जुजबी दंडाची कारवाई करुन त्याना सोडून दिले जाते. पाचशे रुपये दंड आकारुन अवजड वाहने सोडली जातात. यामुळे स्थानिक वाहनांही मालवाहतुकीस परवानगी दिली जावी, अशी मागणी आहे.
या बाबत वाहन चालकांनी सोमवारी साखरपा पोलिस तपासणी नाक्यावर तालुक्यातील चाळीसहून अधिक वाहनधारकांनी धडक दिली. जर अवजड माल वाहतुकीस परवानगी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, उमेश गांधी, योगेश चव्हाण, ओंकार सुर्वे, महेश पाटील, योगेश केतकर, राजन मोहिरे यांच्या सह साखरपा, देवरुख विभागातील वाहनधारक उपस्थित होते.