रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील घराच्या प्लॅस्टरचे काम करत असताना कामगाराला इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 7 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास घडली.
अफजल हूसेन तलुकदार (30, मुळ रा.कचर आसाम सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. खबर देणार आणि त्याचा मयत भाउ अफजल हे दोघेही काही दिवसांपूर्वी नोकरीनिमित्त रत्नागिरीला आले होते. 7 जानेवारी रोजी अफजल व त्यांच्या मुळ गावातील भावाचा मित्र बिलाल अहमद मुजुमदार असे दोघेही मुरुगवाडा येथील एका घराच्या प्लॅस्टरचे काम करत होते. सायंकाळी 4 वा. सुमारास प्लॅस्टरचे काम चालू असताना अफजल हा त्याठिकाणी मदतीसाठी उभा असताना त्याचा हात घरातील इलेक्ट्रिक वायरला लागला. त्यामुळे त्याला अचानकपणे शॉक लागून तो खाली पडला.
ही बाब बिलाल मुजुमदारच्या लक्षात येताच त्याने तातडीने बाजूची लाकडी काठी घेउन अफजलला त्या वायरपासून दूर केले. त्यानंतर अफजलला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.