उदय सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आयोजन
रत्नागिरी:- मागील काही महिन्यांपासून साथींच्या आजाराचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नियोजन डळमळीत झाले असल्याने, छोट्या-मोठ्या आजारांमुळे आणखी खिशाला चाट पडत आहे. सर्वसामान्य जनतेची होणारी ससेहोलपट पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदय सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्ष व जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन 9 फेब्रुवारी रोजी केले आहे. याठिकाणी सर्व आजारांवर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
रत्नागिरी शहरातील दामले प्रशालेच्या इमारतीमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे. याठिकाणी रक्तदान शिबीर, आभा कार्ड व आयुषमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, नेत्र तपासणी करुन मोतिबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, ईसीजी व सर्व तपासण्या, कार्डीऑलॉजिस्टकडून तपासणीस व जिल्हा रुग्णालयात आवश्यकता पडल्यास 2डी इको तपासणी, स्त्री रोग तज्ज्ञाकडून तपासणी, जनरल सर्जरी, त्वचा रोग व कुष्ठ रोग निदान, अस्थिरोगतज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, बालरोगतज्ज्ञ व बालरोग सर्जनकडून तपासणी व शस्त्रक्रिया, मुत्रविकार तज्ज्ञ तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, मेंदुविकार तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आयुष विभाग, असंसर्गजन्यरोग तपासणी, समुपदेशन व उपचार, एड्स कंट्रोल सोसायटी, दंत चिकित्सा व उपचार, मानसोपचारतज्ज्ञ तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरामध्ये मुंबईतील कामा हॉस्पीटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मदिहा मेमोन, डॉ. दिक्षा जावळे, सायन हॉस्पीटल डॉ. असिफ मुल्ला, डॉ. तुषार पाटील, डॉ. अमोल, डॉ. पारस कोठारी, डॉ. सौरभ लिमये, लिलावती हॉस्पीटलचे डॉ. दिलरुप पोईल व डॉ. नितिश दास यांच्यासह रत्नागिरीतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मागील सहा महिन्यांपासून लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत विविध आजारांवर उपचार करणारी आरोग्य शिबीर ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षातर्फे आयोजित करण्यात आली असून यात मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.
आरोग्य तपासणीसाठी येणार्या नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी मदत कक्षाच्यावतीने विशेष मेहनत करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे आमचे लक्ष उदय सामंत वैद्यकीय सहाय्यता मदत कक्ष हे घोषवाक्य विशेष लक्षवेधी ठरले आहे. रत्नागिरी शहर व मतदार संघातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षातर्फे करण्यात आले आहे.