उद्या मेळावा; उपमुख्यमंत्री फडणवीसही राहणार उपस्थित
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळावा शुक्रवारी (ता. १७) ला चंपक मैदानात होणार आहे. यासाठी राज्यातील १ लाख शिक्षक मेळाव्यात सामिल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाचे उद्घाटक असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आहेत. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकंमंत्री उदय सामंत हे स्वागताध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती शिक्षक नेते संभाजीराव थोरात आणि राज्याध्यक्ष अंबाजीदास वाजे यांनी दिली.
एकच मिशन, जुनी पेन्शन -जुनी पेन्शन याप्रमुख मागण्यांसह प्रथामिक शिक्षकांच्या ३५ प्रलंबित मागण्या सोडवण्याची हीच वेळ असून यावेळी संघ विराट शक्तीचे प्रदर्शन करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी राज्य कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहु कांबळे, संपर्क प्रमुख विकास नलावडे, संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम आदी उपस्थित होते.
श्री. थोरात म्हणाले, तीन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांचा हा मेळावा होणार आहे. यापूर्वी रत्नागिरीतच शिक्षक अधिवेशन झाले होते. पुन्हा रत्नागिरीत हा मेळावा होतो आहे, हे आमचे भाग्य म्हणावे लागले. शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आहे. अनेक उच्चशिक्षित शिक्षक आमच्याकडे आहेत. आम्हाला कोणतेही राजकारण न करता शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे आहेत.
शिक्षकांना पुन्हा जुनी पेन्शन लागू करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. शिक्षकांचे घरभाडे कापण्याचे काम राज्यभरात सुरू आहे. ते थांबले पाहिजे अशी आमची दुसरी प्रमुख मागणी आहे. यासह ३५ मागण्यांबाबत मेळाव्यात शासनाला विचारणा केली जाणार आहे. राज्यभरात शिक्षक संघाचे २ लाख सदस्य आहेत. आतापर्यंत १४ अधिवेशन झाली असून शुक्रवारी (ता. १७) उद्यमनगर येथील चंपक मैदानावर सकाळी १० वाजता होणारा हा शिक्षक मेळावा १५ वा आहे. या मेळाव्यात राज्यातील १ लाख शिक्षक सामिल होऊन आपली ताकद दाखविणार आहेत. त्यासाठी शासनाने २ दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.