मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत दाखल; भाजप, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जोरदार स्वागत

रत्नागिरी:- मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताला विमानतळावर बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

मारुती मंदिर येथे ढोल, ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री प्रवास करणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी शुभेच्छा फलक झळकवण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मारुती मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी मारुती मंदिर येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरीत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवराय यांच्या आश्र्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले आणि श्री देव भैरीच्या दर्शनासाठी रवाना झाले.