मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत; 800 कोटींच्या विकासकामांचा एकाचवेळी शुभारंभ 

रत्नागिरी:- मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ना.एकनाथ शिंदे शुक्रवारी प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची भूमीपुजने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. प्रमोद महाजन क्रीडा संकुलातील जाहीर सभेत मुख्यमंत्री कोणती भूमिका जाहीर करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळावर आगमन होईल. मारूतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री अभिवादन करतील. ग्रामदेवता श्रीदेव भैरीबुवा मंदिरात जाऊन मुख्यमंत्री भैरी बुवाचे दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होणार आहे. दुपारी 1.30 ते 2.45 या वेळेत मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात भाजप पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन, एसटी महामंडळ कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, मच्छिमार संघटना, आंबा बागायतदार संघटना, जिल्हा परिषद, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करणार आहेत. 

सायंकाळी 3.45 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमीपूजन होणार असून या ठिकाणी छोटेखानी सभा देखील होईल. सायंकाळी 4 वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर सभा होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुमारे 800 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन होणार आहे. सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री रत्नागिरीहून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. रात्री सोयीनुसार ना.एकनाथ शिंदे कोल्हापूरहून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. आज सकाळी 5 वाजता ना.चव्हाण यांचे शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. सकाळी 11 वाजता ना.चव्हाण मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहतील. सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत ना.रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांच्या समवेत होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता ना.चव्हाण जनशताब्दी एक्सप्रेसने रत्नागिरीहून पनवेलकडे प्रयाण करतील. याशिवाय कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि बंदरे व खनिज मंत्री दादा भुसे हे देखील शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.