रत्नागिरी:- राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी दौर्यावर येत असून, या दिवशी रत्नागिरी मतदार संघात तब्बल पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणाचे उद्घाटनही मुख्यमंत्री करणार असून रत्नागिरीच्या ईतिहासातील अभूतपूर्व अशी सभा होणार असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
येथील एमआयडीसीच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. शुक्रवारी पहाटे आलेल्या पालकमंत्री आ. सामंत यांनी रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, स्व. प्रमोद महाजन क्रिडासंकुलाची जिल्हाधिकारी व अन्य अधिकार्यांसह पाहणी केली.
मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या दौर्याविषयी अधिक माहिती देताना ना. सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासाबाबत ते अधिकार्यांची सकाळी हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये आढावा बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 5वी ते 10वीच्या मुलांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन होणार असून, यावेळी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीतील इंजिनिअरींग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौर्यात तब्बल रत्नागिरी मतदार संघातील तब्बल पाचशे कोटीहून अधिक कामांचा शुभारंभ एका क्लिकवर मुख्यमंत्री करणार आहेत. यामध्ये 137 कोटीची मिर्या हातखंबा नळपाणी योजना, 106 कोटीचे शहरातील काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन, 100 कोटीहून अधिकच्या किंमतीचे पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस कर्मचारी वसाहत, 93 कोटी रुपयांचे नाणीज येथील धरण, 32 कोटींचे जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेसाठीचे कळझोंडी येथील धरणाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. लांजा व राजापूर तालुक्यातील काही विकास कामांचा शुभारंभही यावेळी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या विकासात्मक दौर्यानिमित्ताने रत्नागिरीत येणार्या मुख्यमंत्री ना. शिंदे यांची विक्रम मोडणारी अभूतपूर्व अशी सभा रत्नागिरीत सायंकाळी 4 वा. होणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी विमानतळाच्या भूमीअधीग्रहणासाठी 77 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी जमीन मालकांना गुंठ्याला 47 हजार रुपये दर निश्चित करण्यात आला असून त्याच्या चौपट अशी 1 लाख 88 हजार रुपये भाव दिला जाणार आहे. टर्मिनल इमारतीचे काम पुढील महिनाभरात सुरु होणार असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.