मुंबई-ठाणेच्या धर्तीवर शहरात 50 खाटांचे रुग्णालय उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई आणि ठाणे येथे रुग्णालय सुरु झाले आहेत, त्याच धर्तीवर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे 50 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असून तेथे केवळ एका केस पेपरच्या आधारावर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील निवडणुका संपल्यानंतर रत्नागिरीत आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत घेऊन विविध विकासकामाचे प्रगतीपुस्तक मांडले. यावेळी ते म्हणाले, 20 मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा टप्पा संपला. त्यामुळे रत्नागिरीतील विकासकामांचा आढावा आज दिवसभर घेण्यात आला. त्यामध्ये 77 कोटींच्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे 80% काम पूर्ण झालं असून ती दोन महिन्यात पूर्ण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कोटीच्या प्रशासकीय इमारतीचं काम प्रगतीपथावर आहे, नगर परिषदेची नूतन इमारत अंतिम टप्प्यात आहे, तर रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन इमारतीचे काम 90% संपलं असून लवकरच ही इमारत पूर्ण होईल असेही ते म्हणाले. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा काम सुद्धा येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला आहे. तर राहाटाघर बस स्थानकातील काँक्रिटीकरणासह इतर काम 15 दिवसात पूर्ण होणार आहेत. रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीचे काम 60% पूर्ण झालं असून येत्या महिनाभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक स्मारकाच्या नुतनिकरणाच्या पहिला भाग पूर्ण झाला असून तेथील उजव्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र आणि वाचनालय सुरू केलं जाईल असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या 60 कोटीच्या बंधार्‍याचं काम 80% पूर्ण झालं असून 41 कोटींच्या सुशोभीकरणाचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. थ्रीडी मल्टीमीडियाचे काम पूर्णत्वास आलं असून 15 ऑगस्टला त्याचं लोकार्पण होणार असून या थ्रीडी मल्टीमीडिया मध्ये मराठीसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह हिंदी आणि इंग्रजी आवाजासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज असेल असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतील पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत उद्घाटनासाठी तयार आहे. असेही ते म्हणाले. रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे, हे काम पूर्णत्वास आलं असून विविध इतर रस्त्यांचे काम पूर्णत्वास आले आहेत. साईड पट्ट्यांचे काम जे रखडलं आहे ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल अस पालकमंत्र्यांनी सांगितलं. तर मिर्या नागपूर महामार्गातील कोकण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचे अपूर्ण असलेल पावसाळापूर्वी पूर्ण केल्या जाणार असल्याचे ठेकेदाराने आपल्याला सांगितल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जसं मुंबई आणि ठाणे येथे दवाखाना सुरू झाला तसाच 50 खाटांचा दवाखाना रत्नागिरी मध्ये सुद्धा सुरू होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं.

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यामध्ये महायुती सर्वाधिक जागा जिंकेल आणि अनेकांना धक्का देणारे निकाल लागतील असेही ते म्हणाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चारशे पार च्या आकड्यांमध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विजय मिळेल, असा विश्वास सुद्धा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.