मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी १२ कोटी

यशवंत घोटकर ; कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटीचा निधी मंजूर केला असून, तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार एजन्सींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यानी दिले.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगडपासून आंदोलनाचा इशारा देताच नॅशनल हायवे विभागाने संयुक्त बैठक घेऊन चौपदरीकरणाचे काम जानेवारी महिन्यात नव्याने सुरू करणार असल्याचे आणि खड्डे भरणाऱ्या ठेकेदार एजन्सीवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

महामार्गाचे काम सुरू होऊन ११ वर्षे रखडले आहे. या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. पनवेल ते संगमेश्वरदरम्यान महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. पेण ते कोलाड, तिसे हा रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्यावरील साधे खड्डे भरून हा मार्ग सुस्थितीत करण्यास एनएचएआयला सपशेल अपयश आल्याने वाकणनाका येथे अभिनव मार्गाने भजन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या विषयी एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी त्यांच्या पनवेल कार्यालयात गुरूवारी संयुक्त बैठक बोलावली. या वेळी पत्रकार उपस्थित होते. बैठकीत नॅशनल हायवेने हा रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून 12 कोटीचा निधी मंजूर केला असून, तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात होणार असल्याचे तसेच खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार व देखरेख एजन्सींवर कारवाई करण्यात येईल, असे घोटकर यांनी सांगितले.