खेड:- खेड तालुक्यातील व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लवेल गावाजवळील सुगरण धाब्याजवळ मुंबईहून झालेल्या दुचाकी अपघातात स्वार ठार झाला. चिपळूणच्या दिशेने निघालेली दुचाकी ( एमएच 05 BN 1045) वरील दुचाकीस्वार मनीष मनोहर महाले (वय 38 रा., कांदिवली, मुंबई) हा महामार्गावर आडवा आलेल्या बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर दुचाकी घसरली. याचवेळी भरघाव वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणारा टॅन्कर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
हा अपघात मंगळवार 18 एप्रिल रोजी दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास घडला. अपघाताची खबर मिळताच वहातुक पोलीस व लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मयत दुचाकीस्वाराला रुग्णवाहीकेने कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणी करून दुचाकीस्वार मनीष मनोहर महाले हा इसम मृत पावल्याचे घोषित केले. मयताचा मृतदेह कळबणी उपजिल्हा रूग्णालयाच्या शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आला. तर अपघाताचा पंचनामा पोलीसांनी करून या अपघातात व दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठरल्याप्रकरणी टॅन्कर चालकाला ताब्यात घेतला असल्याचे समजते. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.