रत्नागिरी:- महामार्गावरील कामकाजाची पाहणी करुन अहवाल तयार करण्याचा निर्णय कोकण हायवे समन्वय समितीने घेतला आहे. ही समितीकडून येत्या दोन महिन्यात मुंबई-गोवा महामार्गाचा सर्व्हे केला जाणार आहे.
कोकण हायवे समन्वय समितीची बैठक संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कोकण हायवे समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते. महामार्गाविषयी सद्यःस्थितीबद्दल मते मांडतानाच भविष्यात कोकण हायवे कसा विकसित करता येईल यावर चर्चा झाली. तीन टप्प्यात अभ्यास करण्यासाठी गट तयार करण्याचा निर्णय झाला. निवृत्त सरकारी अधिकार्यांची मदत घेऊन महामार्गावरील पूलांच्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे. रस्त्यावरील एक्झीट कशा पध्दतीचे आहेत, त्यात कोणत्या सुचना करणे आवश्यक आहे, साईन बोर्डांची माहिती घेणे आणि त्या ठेकेदाराच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. आरवली पट्ट्या दरम्यान काहीच काम झालेली नाहीत. काम बंद असताना ठेकेदार का बदलला नाही याबद्दल विचारणा करण्यावर चर्चा झाली. चिपळूण ते लांजा काहीच काम झालेले नाही. महामार्गावर रंगीत व शोभिवंत झाडे लावून तो अधिक चांगला कसा दिसेल, रस्त्याशेजारी जांभ्या दगडात कोकणाचे सौंदर्य दाखवणारे डिझाइन्स काढून भिंती रंगवावे याबाबत सुचना करणे गरजेचे आहे. या कामांवर लक्ष देण्यासाठी अभ्यास गट व दबाव गट असे दोन गट तयार करणे आवश्यक असल्याची सुचना उपस्थितांनी केली. अभ्यास गट सर्व कामाचा अहवाल तयार करेल आणि त्या अहवालाप्रमाणे दबावगट पाठपुरावा करेल अशी सुचना यावेळी करण्यात आली. झालेल्या कामाचा दर्जा तपासणे आवश्यक असून त्यावर योग्य कार्यवाही कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहीजे. महामार्गावर 22 पुलांचे बांधकाम एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले. त्यामुळे पुलांचे काम खुपच निकृष्ट दर्जाचे आहे. वृक्षारोपणाची कामे स्थानिकांना दिली तर त्यातून रोजगार निर्माण होऊ शकेल. पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कामकाजाची सद्यस्थिती पाहण्याची व अहवाल तयार करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर आणि पुढे खेडपर्यंत दोनशे किलोमीटर हायवेचा अभ्यास दौरा करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यात संपूर्ण महामार्गाच्या सद्यःस्थितीचा अहवाल बनवण्यात येणार आहे.