रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मच्छीमार सहकारी संघ मर्यादित रत्नागिरी या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांवर झालेल्या अन्यायाबाबत श्री दुर्वास वणकर व इतर सहा यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत केलेल्या याचिकेमध्ये मोठे यश प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघ ही संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार संस्थांच्या सभासदांना शासनाचे मिळणारे सर्व लाभ देण्यासाठी जिल्ह्याची संस्था म्हणून कार्यरत आहे आणि या संस्थेला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव जोडलेले आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जाते. रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघ या संस्थेची मुदत संपत आल्यामुळे 2023 ते 2028 या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची नेमणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीतील कार्यक्रमाप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख होती 27 डिसेंबर 2022. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 34 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार सहकारी संघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. परंतु छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 34 पैकी 30 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवत फेटाळून लावले होते. त्यावर फक्त सहा जणांना निकालाची प्रत मिळाल्यामुळे त्यांनी मुंबई येथील सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल करून आपले म्हणणे मांडले होते आणि त्यानुसार त्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यास परवानगी देण्यात आली होती.
श्री बाबामिया मुकादम, श्री दुर्वास वनकर, श्री विठ्ठल भालेकर, श्रीमती वैशाली खडपे, श्री विनायक खडपे आणि सिद्धार्थ देवडेकर या उमेदवारांना मात्र निर्णयाची प्रत खूप उशिराने प्राप्त झाली आणि तोपर्यंत निवडणूक कार्यक्रमाचा पुढील भाग सुरू झाला होता त्यामुळे निकाल मिळाल्यानंतर तीन दिवसांमध्ये या उमेदवारांनी मुंबई येथील सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांच्या न्यायालयात अपील दाखल करून दाद मागितली होती परंतु त्यावर कोणताच निर्णय होत नव्हता आणि निवडणूक कार्यक्रम पुढे जात होता त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती.
दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सरकार पक्षातर्फे सदर अर्जदारांचे अर्ज निर्णयाद्वारे फेटाळण्यात असल्याचे म्हणणे सादर करण्यात आले आणि त्या निर्णयाची प्रत उच्च न्यायालयास देण्यात आली यावर ॲड. भाटकर यांनी प्रत्युत्तर देत सदरच्या निकालाबद्दल आम्हाला माहिती नाही तसेच आम्हाला कोणतीही सुनावणी दिली गेली नाही असा आशयाचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला.
खंडपीठाने विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अर्जदार यांना सुनावणी न दिल्याचे मान्य करत, विरोधात दिलेला निर्णय मागे घेत असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले आणि अर्जदारांना सुनावणीची योग्य ती संधी दिली जाईल असेही आश्वासन न्यायालयासमोर लेखी स्वरूपात मांडले. परंतु सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी निवडणूक असल्याने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आल्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही सुनावणी अंती घेतलेला निर्णय अर्जदार कडे पोहोचण्यापर्यंत निवडणूक स्थगित करीत असल्याचे न्यायालयात लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये शक्यतो न्यायव्यवस्था हस्तक्षेप करत नाही परंतु या प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनी हेतू पुरस्कार अधिकाऱ्यांनी चुका केल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर अधिकाऱ्यांनी स्वतः निवडणूक स्थगित केल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.
याचिकेमध्ये अर्जदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेल्या चुका आणि नैसर्गिक न्याय तत्त्वाची केलेली पायमल्ली कोर्टासमोर सादर केली असता कोर्टाने कडक ताशेरे ओढल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आश्वासन दिले.
या निवडणूक स्थगितीमुळे अर्जदार यांना दिलासा मिळाला असून पुढील निवडणुकी कार्यक्रमासंदर्भात मात्र कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे आणि याला निवडणूक निर्णय अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर ही याचिका श्री दुर्वास वणकर आणि इतर यांनी ॲड. राकेश भाटकर यांचे मार्फत दाखल केलेल्या याचिकेला मोठे यश आले असून निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने सदरची याचिका निकाली काढण्यात आली आहे.