मुंबईत बसून वॉटर स्पोर्टबाबत निर्णय नको

वॉटर स्पोर्टवरील बंदी लवकरच उठवू: ना. सामंत 

रत्नागिरी:- मुंबईत बसून रत्नागिरीत काय सुरू करायचे आणि काय सुरू करायचे नाही हे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी ठरवू नये. जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टसला घातलेली बंदी लवकरच उठवली जाईल, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्याचा कोरोना बाबतचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ना. उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी उपस्थित होते. यावेळी डिसेंबर अखेर कोरोनावरील लस दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध होईल. या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.

यंत्रणा सज्ज
यावेळी बोलताना ना. सामंत यांनी सांगितले की, दोन्ही जिल्ह्यांचा आढावा यावेळी घेतला. दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा प्रशासन व यंत्रणा सज्ज आहे. डिसेंबर अखेर कोरोनावरील लस दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कोरोनाकाळात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा सर्वाधिक विचार यावेळी केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार कर्मचारी काम करीत होते.
एका दिवसात १० हजार लोकांना लस
डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही जिल्ह्यात लस उपलब्ध होईल असे सांगून ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात १६ लाख वॅक्सिन कोल्ड स्टोरेज व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ लाख कोल्ड स्टोरेज होईल अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तसेच एका दिवसात १० हजार लोकांना आपण लस देऊ शकतो एवढी तयारी प्रशासनाने केली असल्याचे ते म्हणाले.
एमबीबीएस सिंधुुदुर्गात तर एमडी रत्नागिरीत
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार होणार. सिंधुदुर्गचा प्रस्ताव गेला आहे. आता एक वेगळी संकल्पना राबविण्याबाबत विचारविनिमय सुरू असून सिंधुदुर्गमध्ये एमबीबीएस तर रत्नागिरीत एमडी पदवीचे शिक्षण घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या पाठिशी
उद्या मराठा आरक्षणावर पाच जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टात राज्य सरकारने दाद मागितली. उद्याच्या सुनावणीदरम्यान मराठा समाजाच्याबाजूने सरकारने खंबीरपणे बाजू मांडेल, असा विश्‍वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

वॉटर स्पोर्टस सुरू होणार
कोरोनाकाळात बंद पडलेले वॉटर स्पोर्टस सुरू व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली. मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी वॉटर स्पोर्टसला परवानगी नाकारल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर ना. सामंत यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली आहे. मुंबईत बसून रत्नागिरीत काय सुरू करावे आणि काय सुरू करू नये हे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी ठरवू नये असे खडे बोल ना. सामंत यांनी सुनावले आहेत.