रत्नागिरी:- शिवसेना नक्की कोणाची, उध्दव ठाकरेंची कि एकनाथ शिंदेंची हा तिढा आता निवडणुक आयोगाकडे पोचला आहे. ठाकरे यांच्या आदेशावरुन पदाधिकार्यांची प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात असून रत्नागिरी शहरातील नऊ नगरसेवकांनी ती लिहून दिल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्यांपैकी शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदार उदय सामतांबरोबर कोण आहेत याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहे.
माजी खासदार अनंत गिते यांच्या दौर्याप्रसंगी शनिवारी (ता. 23) पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेनेकडून भरुन घेतल्या जाणार्या प्रतिज्ञापत्राबाबतची माहिती आमदार साळवी यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, रत्नागिरी पालिकेमध्ये मागील पाच वर्षांमध्ये 30 नगरसेवक निवडून गेले होते. त्यात 17 नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले होते. त्यातील नऊ नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. एकुण तिस नगरसेवकांमधील 5 जणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले होते. त्यातील चार जणं उदय सामंतांबरोबर गेले आणि एक अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. उर्वरित शिवसेनेच्या सतरापैकी बंटी किर, बाबा नागवेकर, मिरा पिलणकर, रशिदा गोदड, फराह पावसकर, मधुकर घोसाळे यांच्यासह नऊ जणांचा सेनेला पाठींबा आहे. या नगरसेवकांनी प्रतिज्ञा पत्र लिहून देत आम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले आहे. सध्या माजी नगराध्यक्ष राहूल पंडित यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच केली आहे.
दरम्यान, शिवसेनेत ताकद दाखवून देण्यासाठीची जोरदार लढाई सुरु झाली आहे. सामंतांकडे जाणार्यांवर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला तर काहींची पदावरुन हकालपट्टी केली गेली. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या होत आहेत. काही दिवसांपुर्वी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आमदार उदय सामंत यांच्या स्वागताला एकोणीस नगरसेवकांनी भेटी दिल्याची माहिती पुढे आली आहे. आता शिवसेनेचे उपनेत राजन साळवी यांनी थेट नऊ जणांची यादीच तयार करत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यामुळे सामंतांची पुढील भुमिका काय राहणार याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत. सामंत यांनी शिवसेनेत आल्यानंतर मागील काही वर्षात सेनेच्या बहूतांश लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पाठबळ दिले होते. त्यामुळे त्यांची वैयक्तिक ताकदही तेवढीच आहे. हीच मंडळी आमदार सामंत यांना निवडणार की शिवसेना पक्ष याकडे लक्ष लागले आहे.