आप्पा वांदरकर यांचा आरोप
रत्नागिरी:- मिर्या येथील नव्याने बांधण्यात येणार्या बंधार्याच्या कामाचा शुभारंभ होऊनही प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. याकडे जे अधिकारी कानाडोळा करत आहेत. त्यांची चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करु असा इशारा एका निवेदनाद्वारे मिर्या ग्रामस्थ आप्पा वांदरकर यांनी दिला आहे. हे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
तात्कालिन पालकमंत्री रविंद्र वायकर यांची गाडी अडवून 26 जानेवारी 2019 रोजी हजारो मि-या ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मिर्या ग्रामस्थांना मातोश्रीवरती चर्चेसाठी आणि या बंधार्या विषयी माहिती घेण्यासाठी बोलावले. तात्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधीत मंत्री कार्यालयाशी संपर्क साधून तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुढील कामाला चालना दिली. पुढे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर मि-या सागरी धूपप्रतीबंधक बंधार्याच्या कामाला अग्रक्रम देऊन 179 कोटी रुपये मंजूर केले. संबंधित खात्याला आदेश करून बंधार्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा असे आदेशही दिले. संबंधित खात्याने कामाची निवीदा प्रक्रिया पूर्ण करून 8 नोव्हेंबर 2021 रोजी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. 26 डिसेंबर 2022 रोजी तात्कालिन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते भुमिपूजन झाले. त्यानंतर आतापर्यंत मिर्या बंधार्याच्या नवीन कामाला आरंभ झालेला नाही. एका ठिकाणी बारीक दगडांचा ढिग आणून ठेवण्यात आला आहे. एक पोकलेन मशिनही तेथे उपलब्ध होते. यंदाच्या पावसाळ्यात मिर्या बंधार्याचा काही भाग वाहून गेला होता. तेथेही प्रशासनाने तत्काळ उपाययोजना म्हणून दगडी टाकून डागडुजी करण्यात आली. तात्पुरती मलमपट्टी करत असताना बंधार्याच्या प्रत्यक्ष कामाकडे मात्र अधिकार्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये ठेकेदाराला नक्की कोण पाठीशी घालत आहे हा प्रश्नच आहे. कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. याबाबत कार्यकारी पतनअभियंता व ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा कामाचे भुमीपुजन झालेल्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2022 ला आमरण उपोषण करु असा इशारा दिला आहे.