रत्नागिरी:- मिर्या बंधार्याच्या सर्व्हेनंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारे सात स्पॉट निश्चित केले. त्याच्या दुरुस्तीचा सुमारे 98 लाखाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे या धोकादायक स्पॉटना आणखी धोका निर्माण झाला आहे. दुरुस्तीसाठी आधीच वेळकाढूपणा झाला असताना आता शासनाच्या 33 टक्के कपातीच्या धोरणामुळे 98 लाखाच्या निधीलाही कात्री लागणार आहे. मंत्री उदय सामंत यानी याला दुजोरा दिला तसेच तातडीची दुरुस्तीही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
‘दुष्काळात तेरावा महिना‘ या म्हणीप्रमाणे मिऱ्या बंधारा प्रस्तावाची गत झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे देश अडीच महिने लॉकडाऊनमध्ये आहे. आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यामुळे विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला शासनाने 33 टक्के कात्री लावली आहे. याचा फटका मिर्या बंधार्याच्या 98 लाखाच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला बसला आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री उदय सामंत यांनी त्याला दुजोरा दिला. तसेच ‘निसर्ग’ वादळामुळे वाहून गेलेल्या मिर्या बंधार्याची तातडीची दुरुस्तीदेखील हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.