रत्नागिरी:- येथील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज पाहण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. त्यांच्यासाठी स्थानिकांनी हॉटेल सुरू केले असून, या माध्यमातून पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली आहे. येत्या काही दिवसांत पर्यटन स्पॉट बनलेले जहाज बाजूला काढण्यात येणार आहे.
दुबईहून मालदीवला जाणारे जहाज ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. भरकटलेले बसरा स्टार जहाज गेले पाच वर्षे मिऱ्या किनारी अडकून पडलेले आहे. हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काही स्थानिक तरुणांनी या जहाजावर अनेक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले होते.
मिऱ्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य परिसर आणि तिथे असलेले हे जहाज पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजणांनी मिऱ्या येथे हजेरी लावली. अनेकजणं येथे फोटोसेशन करतात. या जहाजाला आपसूकच प्रसिद्धी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील तरुण पर्यटक आज मिऱ्या येथे जहाज पाहण्यासाठी आले होते. त्यांनीही रिल पाहून येथे मिऱ्या किनारी आलो, असे सांगितले.
पर्यटक वाढू लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ तळेकर यांनी पर्यटकांसाठी हॉटेल सुरू केले. दरम्यान, शासनाने जहाज भंगारात काढण्यास परवानगी दिल्यानंतर कस्टम विभागाकडून मूल्यांकन करण्यात आले. सुमारे पाच वर्षांनंतर ते जहाज भंगारात काढले जाणार आहे. ३५ कोटींचे जहाज दोन कोटीत भंगारात काढले जाणार आहे. संबंधित कंपनीने मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार सुरू केला आहेत. त्याला १५ दिवसांत परवानगी मिळेल.