तीन मोठ्या कंपन्या स्पर्धेत; जिल्ह्यातील एका कंपनीचा समावेश
रत्नागिरी:- मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर होणाऱ्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १५४ कोटी ४१ लाखाची निविदा पत्तन विभागाकडून प्रसिद्ध केली आहे. त्याला प्रतिसाद मिळाला असून ३ मोठ्या कंपन्यांनी त्यासाठी निविदा भरल्या आहेत. यामध्ये एक स्थानिक कंपनी असल्याने एवढे मोठे काम कोणत्या कंपनीला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मिर्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला. मोनार्च कन्सल्टंट कंपनीने त्याचा डीपीआर तयार करून प्रेझेंटेशन झाले. सूचना, हरकतीचा विचार करून डीपीआर फायनल झाल्यानंतर शासनाकडे या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सीआरझेडचा नाहरकत मिळवून २०२१ पर्यंत कामाची वर्कऑर्डर देण्याच्या हालचाली पत्तन विभागाच्या सुरू होत्या. त्या अनुषंगाने पत्तन विभागाने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १५४ कोटी ४१ लाखाची निविदा प्रसिद्ध केली. या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. या कामासाठी श्रीपती असोसिएट्स, डी. बी. पवार आणि इनग्री अशा तीन मोठ्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. पत्तन विभाग आणि शासनाकडून या निविधा उघडून निकषामध्ये बसणाऱ्या एका ठेकेदाराला हे काम दिले जाणार आहे. तिन्हींपैकी एक कंपनी जिल्ह्यातील आहे. यापूर्वी मिरकरवाडा टप्प्या २ चे काम करणाऱ्या ठेकेदाराचा यामध्ये समावेश आहे. निधीअभावी हे आणि अतिरिक्त खर्च झाल्यामुळे हे काम अर्धवट असल्याचे समजते. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामध्ये ७ ब्रेक वॉटरवॉल आहेत. त्यामुळे एकूणच सर्व कंपन्यांच्या कामाची पूर्ण माहिती, कंपनीची पत आदींचा विचार केला जाणार आहे. लवकरच या निविदांवर निर्णय होणार आहे.
गावांचे होणार संरक्षण
मिर्या येथील काही गावांचे संरक्षण सुमारे साडेतीन किमीचा मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा करतो. मिर्या बंधार्याचे दुखणे गेली अनेक वर्षे कायम आहे. दरवर्षी मिर्यावासियांसाठी उधाणाची भरती धोक्याची ठरते. आता रहिवाशांच्या सातबारा उतारावर समुद्र आला आहे. या परिसरात कामयस्वरूपी पक्का बंधारा व्हावा, यासाठी मिर्यावासीयांनी आंदोलन केले. त्याला यश आले आणि शासनाने दखल घेऊन पक्क्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली.