रत्नागिरी:- रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार काल रात्री समोर आला आणि एकच खळबळ उडाली. मिरजोळे रस्त्यावर गोवंशाचे मुंडके आढळल्याने जमाव आक्रमक झाला होता. आरोपींना ४८ तासांच्या आत अटक करु असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला.
अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून वासराचे अवशेष रस्त्यावर पडल्याने हा प्रकार लोकासंमोर आला. हि घटना समजतात गोरक्षक संस्था आणि गोप्रेमी नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक गोळा झाले व त्यांनी पोलीस प्रशासनाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. या घडणाऱ्या प्रकारांबाबत यापूर्वी देखील पोलिसांना कल्पना देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोप्रेमी नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी केला आहे.
जोपर्यंत हि वाहतूक करणारा टेम्पो पोलीस शोधून आणत नाहीत तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना या ठिकाणी मोठा जमाव गोळा झाला. उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यावर वाढीव पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे देखील ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जमावामध्ये थोडी वादावादी देखील झाली. आम्हाला या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी 48 तासांची मुदत द्या आम्ही संबंधितांवर कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांकडून दिल्यावर रात्री तीन वाजता जमाव माघारी फिरला.
मागील अनेक दिवसांपासून घडणाऱ्या अशा घटनांबाबत गोप्रेमी संस्थांकडून पोलिसांना माहिती देण्यात येत होती मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आता गोप्रेमी संस्थाकडून केला जात आहे. कालच्या घटनेमुळे नागरिकांमधून प्रचंड रोष असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी व अशा घटना रोखाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.