मिरजोळे येथे दोन कुटुंबात हाणामारी; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रत्नागिरी:- शहरातील मिरजोळे पाटीलवाडी येथे झाडे आणि कोंबडीवरून एका महिलेला 4 जणांनी मारहाण केल्याची घटना 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.15 वा.च्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा देवेंद्र पाटील (42, मिरजोळे, पाटील वाडी, रत्नागिरी) या स्वतःच्या घराच्या मागील बाजूस कचरा काढत होत्या. त्यावेळी त्या स्वतःशीच पुटपुटल्या ‘काल उपटून फेकून टाकलेलं अननसाच झाड पुन्हा कुणीतरी आमच्या जागेत फेकून दिलय, आमची झाडे आणि कोंबडी कोणाला नडतात, कोणाचे हात मोडलेत काय ते समजत नाही, त्यांच्या या बोलण्याचा राग मनात धरून सुनील भाई पाटील, सौरभ सुनील पाटील, क्षितिज सुनील पाटील, महेश भाई पाटील (सर्व राहणार मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) यांनी दीक्षा पाटील यांना शिवीगाळ व दमदाटी केली. 

चौघांपैकी एक सौरभ सुनील पाटील याने दिक्षा पाटील यांच्या पतीच्या डाव्या हाताच्या बोटावर दगड मारून दुखापत केली. त्यानंतर जमिनीवर पाडून ओढत नेले. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. यावेळी दीक्षा पाटील सोडवायला आल्या असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले. या झटापटीत दीक्षा यांचे पती देवेंद्र पाटील (48) हे जखमी झाले आहेत.याबाबतची तक्रार दीक्षा पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. 
 

तर दुसऱ्या बाजूने सौरभ पाटील (24) याने शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दीक्षा पाटील, देवेंद्र पाटील, पद्मिनी पाटील, अश्विनी पाटील (सर्व रा. मिरजोळे पाटीलवाडी) या चौघांनी सौरभ यांनी जागेतून गटाराचा पाईप टाकायला दिला नाही याचा राग धरून शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता याची विचारणा केली असता दीक्षा व देवेंद्र हे पती पत्नी  सौरभ यांच्या आई – वडिलांच्या अंगावर धावून गेले. देवेंद्र याने त्याच्या हातातील बांबूच्या काठीने वडिलांच्या डोक्यात व उजव्या पायावर मारहाण केली. तर दीक्षा हिने आईच्या डोक्यात हिराच्या झाडूने मारहाण करून ढकलाबुकल करत गळ्यातील मंगळसूत्र तोडून अंगावरील गाऊन फाडून टाकला. तर पद्मिनी आणि अश्विन यांनी सौरभ यांच्या कुटुंबावर कौले फेकून मारली व तुम्ही भेटाल तिथे मारू अशी धमकी दिली. असे सौरभ यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसानी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत.