रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडी परिसरात सुरू असलेल्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या जलवाहिनी दुरूस्तीचे काम उन्हाळ्यात खितपत ठेवून संबधित ठेकेदार आता पावसाळ्यात अवतरल्याचा प्रत्यय ग्रामस्थांना आला आहे. गेले सुमारे महिनाभर काम अर्धवट टाकून गायब असलेल्या ठेकदाराने सोमवारी पुन्हा खोदकाम सुरू करून या परिसरातील ग्रामस्थांना अक्षरशः वेठीस धरण्याचे काम केले आहे.
तालुक्यातील 37 गावे आणि 204 वाड्यांचा समावेश असलेली सुधारित मिर्या, शिरगाव, निवळी तिठा प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी 135 कोटी 72 लाख 78 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. बावनदी येथील पाण्यावर आधारित ही नळपाणी योजना असून या योजनेमध्ये 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये जाकिमिर्या, सडामिर्या, शिरगाव, निवळी, करबुडे, हातखंबा, पानवल, खेडशी, पोमेंडी बुद्रुक, कुवारबाव, मिरजोळे, नाचणे आणि कर्ला ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या योजनेचे सुधारित मिर्या, शिरगाव, निवळीतिठा व 34 गावांची प्रादेशिक नळपाणी योजना असे नाव आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर गावागावात जलवाहिनी खोदाईची कामे सुरू झाली. अनेक गावात खोदाईनंतर कामे देखील पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली. पण मिरजोळे हनुमाननगर, पाडावेवाडी परिसरात संबधित ठेकेदाराने जलवाहिनी खोदाईच्या कामात कळस केल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. उन्हाळ्यात खोदाई करून संबधित ठेकेदार काम बंद ठेवून पसार झालेला होता. त्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर त्या खोदाई उपसून पाईपलाईन टाकण्याची कार्यवाही केली. ती देखील अर्धवट करुन पुन्हा काम बंद ठेवण्यात आले.
पावसाळ्याच्या प्रारंभाला जुनमध्ये अगोदर अर्धवट टाकलेले काम पूर्ण न करता पुन्हा उर्वरित जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू केले. या दिरंगाईच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांना पाडावेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर वाहने चालवतानाही मोठ्या त्रासात टाकले. रस्त्यावर प्रचंड पडलेले खड्डे त्यात एका बाजूने खोदाई करून अर्धवट टाकलेल्या कामामुळे अपघातांना निमंत्रण मिळू लागले. समोरून मोठी गाडी आल्यास छोट्या वाहनधारकांना वाहन बाजूला घेणेही जिकरीचे बनलेले आहे. अशातच आता पुन्हा रस्त्यांची वाताहात उडालेली असताना संबधित ठेकेदार पुन्हा अवतरला आहे. सोमवारी तर पाडावेवाडी रस्त्यावर केलेली खोदाई उपसून प्रचंड मातीमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या ठेकेदाराच्या मनमानी कामाचा लवकरच पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याच्या पवित्रा या परिसरातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
मिरजोळे पाडावेवाडीकडे जाणार्या खराब रस्त्याचे मंजूर झालेले डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी होणार होते. पण संबधित ठेकेदाराने जलवाहीनी खोदाईत केलेल्या दिरंगाईमुळे काम देखील बारगळले. त्याचा नाहक त्रास आज पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.