मिरजोळे ग्रामपंचायत इमारतीच्या सभागृहात कोविड सेंटर सुरु करणार

रत्नागिरी:- मिरजोळे ग्रामपंचायत इमारतीच्या सभागृहात कोविड सेंटर सुरु केले तर रुग्ण सापडल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे शक्य होईल. त्यासाठी प्रयत्न करु असे आश्‍वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी दिले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात सरपंच, उपसरपंच,  ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद घेतला. ग्रामपंचायत सभागृहात कोविड सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा केली. कोविड 19 च्या विरोधात उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत सभागृहात कोविड सेंटर सुरु केल्यास मिरजोळे ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. बने म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड सेंटर आणि रुग्णांची संख्या पाहिल्यास जिल्ह्यात आणखी कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे. जेणेकरून त्या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करता येईल. यासाठी माझी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. जे सहकार्य लागेल ते मी करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,  ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.