प्रदूषित सांडपाणी थेट गटारात सोडल्याने प्रदूषण
रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात गटाराला मोठ्या प्रमाणात कंपनीतील प्रदूषित सांडपाणी सोडण्यात आल्याने गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थांनी या प्रदूषणाचा रोख ओमेगा फिशमिल या कंपनीवर ठेवून कंपनीवर धडक दिली. प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांना पाचारण करून कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारत येथील प्रदूषणाची वस्तुस्थिती दाखवून दिली.
मिरजोळे एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून येथील गटारातून सांडपाणी सोडले जात आहे. पण सद्या मोठ्या पमाणात सोडण्यात आलेले हे सांडपाणी थेट परिसरातील नाल्यातून रहिवाशी पित असलेल्या पाण्याच्या विहीरीत उतरले. त्यामुळे त्या सांडपाण्यामुळे विहीरी दूषित झालेल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप पसरला आहे. परिसरातील पिण्याच्या पाणी विहीरीही सांडपाण्यामुळे दुषित बनल्या आहेत. या सांडपाण्याच्या पदूषणाची बाब मिरजोळे ग्रामपंचायतीकडे मांडण्यात आली. त्यानंतर येथील ग्रामस्थ, ग्रा.पं.चे सदस्य यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीतून सांडपाणी सोडले जात असलेल्या प्रकल्पाकडे धडक दिली.
संतप्त ग्रामस्थांनी एमआयडीसीतील ओमेगा कंपनीकडे या सांडपाण्याच्या पदूषणाचा रोख ठेवला आहे. या कंपनीतून सांडपाणी सोडण्यात आल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्याबाबत रत्नागिरीतील प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱयांना या घटनास्थळी ग्रामस्थांनी पाचारण केले. प्रदूषण मंडळाच क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांची टिम या कंपनीच्या ठिकाणी दाखल झाली. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी या पाण्याचे प्रदुषण दाखवून दिले. या प्रदूषण प्रकरणी ओमेगा कंपनीच्या व्यवस्थापनालाही संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारला. मात्र या प्रदूषणप्रकरणी असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला होता.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी अमित लाटे, ग्रामस्थ सुरेंद्र पाटील, सुरेंद्र कीर, वैभव पाटील, विजय देसाई, विकास सनगरे, वैभव जावकर, योगेश ठिक, तसेच ओमेगा कंपनीचे अधिकारी आशिष साळवी अशा उपस्थित सार्यांनीच कंपनीच्या आवारातील सांडपाणी बाहेर पडणार्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी कंपनीबाहेर पडणार्या सांडपाण्यामुळे झालेल्या पदुषण दाखवण्याचा आग्रह कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकार्यांना करण्यात आला. पण कंपनीच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांच्या वस्तीकडे झालेल्या प्रदूषणाच्या पाहणीसाठी येण्यास नकार दर्शवला. मात्र प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांसमवेत ग्रामस्थांनी झालेल्या पदूषणाची पाहणी केली. कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी व ग्रामस्थांच्या विहीरीतील पाण्याचे नमुने प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांनी घेतले. हे पाणी नमुने पुढील तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी सांगिलते. कंपनीने या सांडपाण्याच्या पदूषणावर तातडीने प्रतिबंध करावा, अन्यथा तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे.