रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे -पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात हातभट्टीवर धाड टाकली. या धाडीत १२ साहित्यासह १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयुर रवी मोरे (वय ३८, रा. किर्तीनगर मजगावरोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) सकाळी पावणेबाराच्या सुमारास मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनाऱी जंगलमय भागात निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटीलवाडी नदिकिनारी हातभट्टीची दारु तयार करुन विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी धाड टाकली या धाडीत ३ हजार ८०० रुपयांचा गुळनवसार कुजके रसायन, ७ हजार ३०० रुपये किमतीचे २०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत रसायन, १ हजार १०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारु, ३०० रुपयांचा डेग, ५० रुपयांची स्टीलची नळी असा सुमारे १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.