रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे येथील नदीकिनारी जमीन खचण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात भेगाही पडल्या असून तो भाग अधिक खचण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंतीचा प्रस्ताव केला आहे; परंतु अजूनही त्याला निधी मंजूर झालेला नाही.
पंधरा वर्षांपूर्वी मिरजोळे येथील नदीकिनारी भाग खचण्यास सुरवात झाली. त्यानंतर दरवर्षी थोडा थोडा भाग खचतच होता. पावसाचा जोर वाढला की तेथील जमीन खचू लागते. आतापर्यंत बर्याच शेतकर्यांची भातशेतीचे नुकसान झाले आहे. यंदाही तो प्रकार सुरूच असल्यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतीचेही नुकसान होणार आहे. गेले आठ दिवस रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर वाढतच आहे. भातशेती लावलेली काही जमिनी खचली असून उर्वरित भागात भेगा पडलेल्या आहेत. त्या वाढत गेल्या तर अजूनही दहा ते बारा गुंठे भातशेती धोक्यात आली आहे.
खचलेल्या भागाची मंडळ कृषी अधिकारी मुकुंद लाड, संदीप मयेकर, मिरजोळे सरपंच बावा नाचणकर यांनी पाहणी केली. तेथील शेतकरी विनायक उर्फ भाऊ भाटवडेकर यांच्या चर्चा केली. पावसाळ्यात डोंगरातून पाणी वाहून नदीकडे येते, त्या वेळी नदीला पूर आला असला की हा भाग खचत जातो. गेली पंधरा वर्षे बराचस भाग ढासळलेला आहे. आताही तो खचण्याची शक्यता आहे, असे भाटवडेकर यांनी सांगितले. जमीन खचत असल्याचे लक्षात आल्यामुळे अलीकडील बाजूस भात लावणी केलेली नाही; मात्र लागवड केलेल्या जागेतही मोठ्या भेगा पडल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मिरजोळेतील खचलेल्या भागाजवळ नदीपात्रात संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. त्याला निधी मंजूर झालेला नसल्यामुळे दरवर्षीचे जमीन खचण्याचे दुखणे कायम राहण्याची शक्यता आहे.