रत्नागिरी:- मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यानच्या खालचापाट परिसरात शेतजमीनीचे अतिवृष्टीमुळे पुन्हा भूस्खलन झालेले आहे. मोठय़ा प्रमाणात खोलवर जमीन भेगा जात आहेत. या प्रकाराने वर्षागणिक शेती नष्ट होत आहे, तर काही अंतरावर लोकवस्ती आहे.त्यामुळे हे अरिष्ट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रस्तावित उपाययोजनांची कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी ग्रामस्थांकडून होत आहे.
अतिवृष्टीच्या काळात याठिकाणी होणाऱया या सततच्या भूस्खलनामुळे येथील शेती संकटात आली आहे. गेल्या आठवडा भरापासून सतत अतिवृष्टी होत आहे. या झालेल्या अतिवृष्टीने येथील शेतीच्या परिसरात पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे तेथील शेत जमिन धोक्यात आलेली आहे. वर्षागणिक येथील एक-एक शेतकऱयाची जमीन नामशेष होत आहे. येथील या होत असलेल्या भूस्खलनाबाबत यापूर्वीच पाटबंधारे विभागाने सुमारे सव्वा कोटी निधीचा प्रस्ताव तयार केला होता, असे येथील ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी सातत्याने प्रशासन स्तरावर ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. प्रशासन मंजूरीसाठी पाठवला जावून त्याद्वारे उपाययोजनांसाठी प्राधान्याने कार्यवाही हाती घेतली जाणार होती. पण या कार्यवाहीची प्रतिक्षा गेल्या तीन वर्षांपासून येथील शेतकऱ्याना आहे.
यापूर्वी त्याठिकाणी नदिकिनारी भुस्खलन होणाऱ्या अर्ध्या भागात संरक्षक बंधारा बांधण्यात आला आहे. पण उर्वरित भागाकडे 2018 मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनस्तरावरून येथील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू झाली होती. मात्र आवश्यक असलेल्या अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता. मात्र त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी विशेष प्राधान्याने कार्यवाही जिल्हा प्रशासन स्तरावरून केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव त्यावेळीच प्राप्त झालेला होता. हा प्रस्ताव तातडीने पालकमंत्र्यांची मंजूरी घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. त्याला मंजूरी मिळताच 2019 मध्ये पावसाळय़ानंतर भुस्खलनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक कामांच्या कार्यवाही सुरू होणार असल्याचे जिल्हा नियोजनमार्फत सांगण्यात आलेले होते. मात्र आजमितीस त्याठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यवाहीची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे. येथील भूस्खलनावरील पुढील उपाययोजना रखडल्या आहेत. असेच भूस्खलन होत राहिल्यास येथील शेतक्षेत्रच नष्ट होण्याचा गंभीर धोका असल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे