रत्नागिरी:- ‘इलाका तुम्हारा धमाका हमारा’ असे म्हणत राजकीय वाद विकोपाला जावून एका बॅनरवरुन २ गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना जांभुळफाटा येथे घडली. फ्रीस्टाईल हाणामारी होत असताना माजी सरपंचावर चाकूने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाली असून, दादागिरी करणार्या पुढार्याला मात्र मजबूत चोपल्याची चर्चा गावात सुरु झाली आहे.
मिरजोळे गावात गेल्या काही दिवसांपासून राजकीय २ गटांत संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत पहायला मिळाला होता. यावेळी देखील धतींगगिरी करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा प्रयत्न अनेकांनी हाणून पाडला. याच दरम्यान एका बड्या पदाधिकार्यावर तथाकथितांनी आरोप करुन तो पदाधिकारीच विरोधक गटाला मदत करत असल्याचा आरोप निवडणुकीवेळी करण्यात आला. तेव्हा पासून सुरु झालेली धूसपूस ही आजतागायत सुरुच होती.
यातील तक्रारदार हर्षराज सुभाष पाटील (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हर्षराज यांच्या वाढदिवसानिमित्त जांभूळफाटा येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रतिष्ठीत नागरीक व मानकर्यांचे फोटो लावण्यात आले होते. हा बॅनर झळकताच त्यातील संशयित संदिप उर्फ बावा नाचणकर यांनी फोन करुन बॅनर कोणाला विचारुन लावलास, अशी विचारणा केली आणि त्यातूनच हा वाद चिघळला.
तू मला विचारल्याशिवाय बॅनर का लावलास, तुझी हिम्मत कशी झाली, असे धमकावत रत्नदीप पाटीलचा फोटो बॅनरवर का लावला अशी विचारणा केली. रत्नदीप व त्याच्या भावाला मी मारण्यासाठी शोधतोय, तुम्ही स्वतःला शहाणे समजता काय?, एकएकाला घरात घुसून मारु, अशी धमकी संदीप उर्फ बावा नाचणकर यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बॅनरवरुन धुसपूस सुरु असतानाच हर्षराज याने रत्नदीप हा आपला गाववाला असल्याचे सांगून, त्या बॅनरवर साहेबांचा फोटो आहे. आजचा एक दिवस बॅनर राहूदे, कोणताही वादविवाद नको, असे सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन बावा नाचणकर व त्याच्या सहकार्यांनी बॅनर फाडून गटारात टाकून दिला. व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल बुुधवारी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास मिरजोळे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींची जांभूळफाटा येथे मिटिंग ठेवण्यात आली होती. या मिटींगमध्ये बावा नाचणकर याला फोन करुन हा वाद मिटवण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार त्याला फोन करण्यात आला. मात्र तुम्हाला काय करायचंय ते करा, मी तिकडे येतो, अशी धमकीच नाचणकर यांनी दिली.
प्रतिष्ठीत व्यक्तींची मिटींग सुरु असतानाच बावा नाचणकर हा एका कारमधून आपल्या सहकार्यांना घेवून जांभूळफाटा येथे आला. हातात लाकडी दांडके घेवून सारेजण गाडीतून खाली उतरले व धकला बुकल करुन लाकडी दांड्याने त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी हर्षराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संदीप उर्फ बावा नाचणकर, योगेश भोसले, भाया कदम, नाना नाचणकर, प्रणय पावसकर व इतर २ यांच्याविरोधात भा.द.वि.क. १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरुन २ गुन्हे दाखल केले आहेत. संदीप उर्फ बावा नाचणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुसर्या गटातील तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसर्या तक्रारीत बावा नाचणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हर्षराज पाटील याने फोन करुन नाचणकर यांला जांभूळफाटा येथे बोलावून घेतले व तू सकाळी काय बोललास अशी विचारणा करत मी सर्व रेकॉर्डिंग ऐकलेली आहे, असे रत्नदीप याने सांगितले.
दोघांमध्ये चर्चा सुरु असतानाच त्याठिकाणी काही क्षणात जमाव जमा झाला व त्या जमावातून एकजण ओरडला निरोप आलाय, याला ठोका, असे म्हणून जमावातील तरुणांनी बावा नाचणकर यांच्यावर हल्ला चढवला. ही मारहाण सुरु असतानाच एकाने चाकू बाहेर काढून त्या चाकूने बावा नाचणकर याच्यावर किरकोळ वार केले. यावरच न थांबता लाथाबुक्क्याने मारहाण करुन याला जिवंत सोडू नका, याला संपवून टाका अशी ओरड मारहाण करतेवेळी केली जात होती.
माजी सरपंच बावा नाचणकर यांना मारहाण सुरु असताना त्यांचा भाऊ प्रदिप हा सोडवासोडव करण्यासाठी पुढे आला. यावेळी जमावाने लोखंडी रॉडने भावाला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संदीप उर्फ बावा नाचणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, पोलिसांनी रत्नदीप पाटील, अभि पाटील, वैभव पाटील, हर्षराज पाटील व इतर ३० ते ४० जणांविरोधात भा.दं.वि.क. १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वैमनस्यांतून मिरजोळेत वादंग निर्माण झाले होते. एक ना एक दिवस विस्फोट होईल, असे भाकित अनेकांनी वर्तविले होते. अखेरीस ते सत्यात उतरले आणि इलाका तुम्हारा धमाका हमारा असे म्हणत दोन गटांत राजकीय वैमनस्यातून जोरदार हाणामारी झाल्याचे चित्र सार्यांनाच बघायला मिळाले.