रत्नागिरी:- मिरकरवाडा मच्छीमार्केटच्या बाहेर बसणाऱ्या मत्स्यविक्रेत्यांना अखेर मिरकरवाडा प्राधिकरणाने शिस्त लावली आहे. पोलिस बंदोबस्तात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना कोट्यवधीचा खर्च करण्यात आलेल्या मच्छीमार्केटमध्ये बसवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील कोंडी फुटली असून, खवय्यांनाही मार्केटमध्ये फिरत हवे ते मासे खरेदी करणे सोपे झाले आहे.
मिरकरवाडा जेटीवरील रस्त्यावरच यापूर्वी बेकायदेशीर बसून मत्स्यविक्रेत्यांकडून विक्री होत होती. यामुळे बर्फ, डिझेल, पाणी, मच्छीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. मत्स्यविक्रेत्यांचे स्टॉल, त्यापुढे ग्राहक यामुळे प्रचंड कोंडी होती होती. मच्छीमारांच्या वाढत्या तक्रारीमुळे मत्स्यविभागाने पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवले. सुमारे पंधरा फूट हा रस्ता मोकळा करण्यात आला. या विक्रेत्यांसाठी १ कोटी रुपये खर्च करून बाजूलाच मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे ७३ ओटे बांधले आहेत. त्यामध्ये त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली; परंतु अनेक विक्रेते मार्केट सोडून पुन्हा त्या रस्त्यावर बसू लागले तेव्हा पोलिस बंदोबस्तात त्यांना पुन्हा मार्केटमध्ये बसवले. त्यानंतर आता दुसरी समस्या निर्माण झाली. विक्रेते पुन्हा मार्केटबाहेर करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूला बसू लागले. मार्केट पुन्हा ओस पडले.
प्राधिकरणाकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलिस बंदोबस्तात या विक्रेत्यांना आता मार्केटमध्ये बसवण्यात आले आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाने विक्रेत्यांना शिस्त लावली आहे.