रत्नागिरी:- मिरकरवाडा जेटीवरील अतिक्रमण कारवाई बुधवारी प्रशासनाने थांबवली. शिवसेना पदाधिकार्यांनी दिलेल्या राजिनाम्यानंतर पालकमंत्र्यांनी ही कारवाई थांबवण्याच्या सूचना केल्याची चर्चा पदाधिकार्यांमध्ये सुरु होती.
मंगळवारी मिरकरवाडा जेटीवरील 303 अनधिकृत बांधकामे पाडण्यास प्रशासनाने सुरुवात केली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस, महसूल प्रशासन व मत्स्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. प्रशासनाने मुदत देऊनही अनधिकृत बांधकामे मच्छीमारांनी काढली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला होता. त्यातून मच्छीमारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. यामुळे मच्छीमार नेते व मिरकरवाड्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी राजिनाम्यांची पत्रे शिवसेना शहरप्रमुखांना पाठवली होती. वरिष्ठ दखल घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पालकमंत्री ना. सामंत यांनी प्रशासनाला कारवाई थांबवण्याच्या आणि मच्छीमारांना बांधकामे काढण्यासाठी वेळ देण्याच्या सूचना दिल्याची चर्चा मिरकरवाड्यातील शिवसेना पदाधिकार्यांमध्ये सुरु होती. त्यामुळे बुधवारी कारवाई थांबवण्यात आली. दरम्यान, मिरकरवाड्यामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.