मिरकरवाडा येथे मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न लावला उधळून

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथे एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला. रिक्षा घेऊन आलेल्या महिलेबाबत नागरिकांना संशय आल्यानंतर तिला रिक्षासह पकडण्यात आले. ‘भाईजान मुझे माफ कर दो । मै आप सबसे माफी मांगती हू। आगे से एैसा नही करुंगी ।।’ अशी विनवणी केल्यानंतर जमावाने त्या महिलेला जाऊ दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत तक्रार नसली तरी शहर पोलिस घटनेची माहिती घेत आहेत.

महिला लहान मुलीला आमिष दाखवून रिक्षात बसवून पळवून नेण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, तेथील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या मुलीची महिलेच्या तावडीतून सुटका केली. जमावाने महिलेला चांगलेच धारेवर धरले. महिला हिंदीमध्ये बोलत होती. ती म्हणाली, ‘भाईजान मै माफी मागती हू । इन लोगोको समजाओ ।।’ त्यानंतर जमावातील काही व्यक्ती म्हणाल्या, हे असे कृत्य करता तुम्ही. तुम्हाला काही वाटत नाही. कोणी सांगितले असे करायला. यापुढे मिरकरवाडेमे आने का नही । काहींनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी महिलेला दिली, मात्र महिलेने माफी मागितल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. मुलांना पळविणारी टोळी शहरात सक्रिय आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यांतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडल्याचा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर पाहिला. अजून कोणी तक्रार केली नसली तरी या प्रकरणाची शहानिशा करत आहोत.”- अनिल लाड, शहर पोलिस निरीक्षक