रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटीवर रस्त्याने चालणार्या एका व्यक्तीवर टेम्पो चालकाने चाकूने वार केल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र लक्ष्मण राजबन्सी (22, रा. मिरकरवाडा जेटी, मूळ नेपाळ) हा बोटमध्ये लागणारा जिन्नस आणण्यासाठी रस्त्याने चालला असताना मागून येणार्या तीन चाकी टेम्पोतील चालकाने तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अशी शिवीगाळ करत आपल्या हातातील छोटा चाकू काढून राजेंद्र राजबन्सी याच्या कंबरेवर वार केला. यामध्ये राजबन्सी हा जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला मनोज चौधरी यालाही टेम्पोची धडक लागल्याने मुकामार लागला.
याबाबतची फिर्याद राजबन्सी (22) याने शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत. फरार टेम्पो चालकाचा तपास सुरु आहे.