रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. हीच परंपरा आता संस्थेच्या पदाधिकारी निवडीत देखील कायम ठेवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी इम्रान मुकादम तर उपाध्यक्ष पदावर अझीम होडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मिरकरवाडा संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच 11 संचालकांच्या निवडी बिनविरोध झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 80 मच्छीमार सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्था प्रतिष्ठीत आणि मोठी संस्था आहे. संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता पदाधिकारी निवडही बिनविरोध झाल्या आहेत.
गुरुवारी पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती टिळेकर यांनी काम पाहिले. यावेळी संचालक इम्रान मुकादम, नुरुद्दीन पटेल, सुहेल साखरकर, नुरुद्दीन वस्ता, बिलाल सोलकर, जुबेर दर्वे, साबिर होडेकर, अझीम होडेकर, जुनेद मजगावकर, अकीला मजगावकर, शकीला मिरकर आदि उपस्थित होते. पदाधिकारी निवडणूक देखील बिनविरोध करण्याबाबत विद्यमान संचालकांनी एकमताने निर्णय घेतला होता. यानुसार संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी इम्रान मुकादम यांचा तर उपाध्यक्षपदासाठी अझीम होडेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी स्वाती टिळेकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यानंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे संचालकांकडून अभिनंदन करण्यात आले.