मित्राचे अंत्यदर्शन घेऊन परतणाऱ्या प्रौढाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

खेड:- मित्राचे अंत्यदर्शन घेऊन परतत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी खेड तालुक्यातील आयनी येथे घडली. शेखर विठ्ठल मोहिते (४५) असे प्रौढाचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने साऱ्यांना धक्का बसला.

खेड तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथील शेखर विठ्ठल मोहिते यांचे मित्र श्रीपत बुरटे यांचा झाडावरुन पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शेखर मोहिते गेले होते. अंत्यदर्शन घेऊन ते बाहेर पडण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच मृत्यूने त्यांना कवटाळले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. मनमिळावू, सतत हसमुख म्हणून त्यांची ओळख होती. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. सर्वांशी स्नेहाचे, आपुलकीचे ऋणानुबंध होते. चिंचघर, दस्तुरी पंचक्रोशीसह तालुक्यात त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. निधनाचे वृत्त समजतात दस्तुरीतील व्यापाऱ्यांनी शनिवारी दुकाने बंद ठेवली होती.