माहेरच्या मालमत्तेसाठी महिलेचा सासरकडून छळ

रत्नागिरी:- माहेरच्यांकडून पैसे, दागिने व मालमत्तेत अर्धा वाटा मिळावा, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नुपूर महेश वाडेकर (३९, रा. आदिष्टीनगर मजगांव रोड, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नुपूर यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नुपूर यांचे पती, सासू- सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नुपूर यांचे पती महेश अनिल वाडेकर (४२), सासरे अनिल शांताराम वाडेकर (७४) व सासू अंजना अनिल वाडेकर (६५, सर्व रा. ऐरोली-नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे पती, सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहेत. गुन्ह्यातील माहितीनुसार, नुपूर यांचे नोव्हेंबर २००९ साली महेश वाडेकर याच्याशी लग्न झाले होते. त्यानंतर नुपूर या मुंबई येथे सासरी वास्तव्यासाठी गेल्या. लग्नाच्या एक वर्षानंतर नुपूर यांचे सासरे अनिल यांनी माहेरातून पैसे व दागिने आण, असा तगादा लावण्यास सुरुवात केली. नुपूर या बाबी आणत नसल्याचे लक्षात येताच तिचे सासरे- सासू यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. या बाबलची सर्व हकिगत नुपूर यांनी आपल्या वडिलांना सांगितली. मुलीचा पैशासाठी होत असलेला छळ लक्षात घेवून तिच्या वडिलांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून एक सोन्याचा हार, दोन सोन्याच्या बांगड्या, कानातील जोड व रोख रुपये ५० हजार दिले. याने समाधान न झाल्याने नुपूर हिचे सासरे, सासू व पती यांनी आणखी पैशाची मागणी केली. तसेच वडिलांच्या मालमत्तेत अर्ध्या हिस्सा मिळावा, यासाठी तगादा लावला, असे नुपूर यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी नुपूर यांनी यापुढे मी माहेरच्यांकडे काहीही मागणार नाही, असे सांगताच तिला पती व सासरे यांनी मारहाण केली. तसेच टोचून बोलू लागले व चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली, अशी तक्रार नुपूर यांनी रत्नागिरी शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी महेश वाडेकर, अनिल वाडेकर व अंजना वाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.