दापोली:- दापोली तालुक्यातील सडवे येथील नदीवर गंभीर डोहामध्ये दोन युवक मासे पकडण्यास गेले असता पाय घसरून पडून बुडून मृत पावले. ही घटना सोमवारी (ता. ४) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. सुजित सुभाष घाणेकर वय (२५) आणि त्याचा नातेवाईक आयुष अनिल चिनकटे (२१) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत.
सडवे येथील जालगाव पाणी योजनेच्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी ते गेले होते; मात्र जालगाव ग्रामपंचायतीचे पंप हाऊस कर्मचाऱ्यांनी तेथे जाण्यास रोखले. त्यानंतर ते दोघे गंभीर डोह येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास मासे पकडण्यास गेले असता पाय घसरून पडले. पाणी खोल असल्याने नाका तोंडात पाणी गेल्याने ते दोघे बुडाल्याची माहिती प्राप्त होत आहे. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले असून, दापोली उपजिल्हारुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.
शवविच्छेदन होऊन पोलिस पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत. या घटनेतील सुजित आणि आयुष दोघेही एकुलते होते. त्यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सडवे गावावर मोठी शोककळा पसरली आहे.