वादळाच्या इशाऱ्याने नौका माघारी; अवघ्या चार दिवसात व्यवसाय पुन्हा ठप्प
रत्नागिरी:- परतीचा पाऊस सुरु असताना आलेल्या वादळामुळे मासेमारी ठप्प झाली होती. चार दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असतानाच आता काही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. मात्र आता पुन्हा वादळाचा इशारा आल्यामुळे मासेमारी संकटात आली आहे. नवा हंगाम सुरु झाल्यानंतर वारंवार मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. वादळाच्या इशाऱ्याने नौका पुन्हा माघारी परतल्या असून अवघ्या चार दिवसातच मासेमारी पुन्हा ठप्प झाली आहे.
पावसाचा जोर ओसरल्याने रविवारपासून काहि नौकाच मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. या नौकाही किनारपट्टी लगतच मासेमारी करत होत्या. इतर मच्छीमार नौका मात्र जिल्ह्यातील बंदरांवर उभ्या होत्या. मासेमारी हा उद्योग जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. मात्र, आठ दिवस मासेमारी बंद होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा मासेमारी सुरु करण्याच्या हलचाली सुरु झाल्या.मात्र सोमवारी पुन्हा वादळाचा इशारा आल्यामुळे मच्छिमारांवर संकट कोसळले आहे.समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारी नौका अजूनही जयगड, वेलदूर, दाभोळ बंदरातच उभ्या आहेत. वादळासह मुसळधार पावसाच्या इशार्यामुळे जिल्ह्यातील बंदरांवर काही परप्रांतीय नौकांनी आश्रय घेतला होता. या परप्रांतीय नौकाही अजून बंदरावरच आहेत. तर शनिवारी हातावर मोजता येतील इतक्या नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. बाकी नौकांची मासेमारी बंदच होती. रविवारी उर्वरित नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या. अशातच पुन्हा वादळाचा इशारा आल्यामुळे मच्छिमारांचा नवा हंगाम अडचणीत आला आहे.