मासळी निर्यातीला सुगीचे दिवस; प्रतिदिन एक कोटीची निर्यात

रत्नागिरी:-  मासळी निर्यातीवरील कोरोनाचे संकट हळूहळू निवळू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मासे युरोपीयन देशांना जेएनपीटी (जि. रायगड) येथून निर्यात होऊ लागले आहेत. दररोज सरासरी एक कोटीचे मासे परदेशात जाऊ लागले आहेत. त्यामुळे मच्छी व्यावसायिकांमध्ये समाधानाचा सुर उमटत आहे. पापलेट, व्हाईट चिंगळं यांचा सर्वाधिक समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात मच्छीमारांना निसर्गाने साथ दिली नव्हती; मात्र सप्टेंबर महिन्यात परिस्थिती सुधारेल असे चित्र आहे. मिरकरवाडा बंदरात सुमारे तीस टन मासळी मिळत असल्याचा अंदाज आहे. त्यात 10 ते 15 किलो पापलेट असून किलोला दर दर्जानुसार 450 ते 1000 रुपये मिळतो. 25 ते 100 किलो व्हाईट चिंगळं मिळत असून किलोला दर 500 रुपये, चालू चिंगळांना 180 ते 200 रुपये, खवला मासा 15 ते 18 रुपये, वाशी 23 रुपये किलो, पातुर्डीला 15 ते 18 रुपये दर मिळतो. यामधील काही मासे फिशमिल, सुरमीकडे पाठवतात; परंतु एकाच दिवशी सर्वच मच्छीमारांना रिपोर्ट मिळतो असे नाही.

कोरोनामुळे गतवर्षी हंगामाच्या शेवटी निर्यातीला मोठा फटका बसला होता. बहूतांशी मासे स्थानिकपातळीवरच विकले गेले. केंद्र शासनाने निर्यातीला चालना देण्यासाठी टाळेबंदीतून शिथिलता दिली होती. चिन-भारत देशांमधील संबंध दुरावत असल्यामुळे त्याचा परिणाम मासळी निर्यातीवर होत आहे. बहूतांश मत्स्य विक्रेत्यांनी युरोपमधील देशांकडे लक्ष वळवले आहे. यंदा रत्नागिरीतून दररोज सुमारे 15 ते 20 टन विविध प्रकारची मासळी निर्यात केली जात आहे. रत्नागिरीतून फ्र्रोजन केलेली मासळी जेएनपीटी बंदरातून जहामधून पाठविली जात आहे. यामध्ये 8 ते 9 टन पापलेट, आठ टन व्हाईट चिंगळांचा समावेश आहे. याचा फायदा मत्स्य विक्रेतांना होत असून मच्छीमारांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समुद्रातील मासळीबरोबरच मत्स्यशेतीअंतर्गत केलेल्या कोळंबीचीही मोठ्याप्रमाणात निर्यात होत आहे. त्याचा फायदा रत्नागिरीचे अर्थकारण सुधारण्यासाठी होऊ शकेल. एक कोटी रुपयांची मासळी निर्यातीला जात असून उर्वरित मासे स्थानिक विक्रेत्यांकडे तर काही मासळी मुंबई, पुणे, गोव्यात पाठवली जात आहेत