रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथे रास्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीने धडक दिली. या अपघातात वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू झाला. संशयित दुचाकी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या वृद्धाच्या अपघाती जाण्यामुळे सन्मित्रनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष वासुदेव सोनार (वय ४०, रा. सनगरेवाडी, कोतवडे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २७) सकाळी सव्वा आठच्या सुमारास माळनाका येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यशोधन दत्तप्रसाद गोडसे (५०, रा. सन्मित्रनगर, बोर्डींग रोड, रत्नागिरी) यांचे वडिल निवृत्त शिक्षक दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (वय ७७) निवृत्त शिक्षक ते रविवारी सकाळी माळनाका पुलावरुन पुलाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी जात
होते. ते माळनाका पुलावरुन खाली उतरुन हॉटेलला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी बसस्थानकहून मारुतीमंदिर जाणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच-०८ एयु २६१५) वरिल स्वाराने ज्येष्ठ नागरिक दत्तप्रसाद गोडसे यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गोडसे रस्त्यावर उपडी पडले. त्यांच्या नाका तोडातून रक्त वाहत होते. गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुलगा यशोधन गोडसे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रमंडळी रुग्णालयात दाखल झाले होते. दत्तप्रसाद हे पेशाने निवृत्त शिक्षक होते. निवृत्ती पश्चात ते एलआयसी प्रतिनीधी म्हणून काम करत होते. ते वधुवर सुचक केंद्रही चालवत. त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताच्या हातावर पेढा आणि तांब्याभर गार पाणी देण्याची त्यांची सवय होती. त्यांच्या परोपकारीवृत्तीमुळे त्यांच्या जाण्याने सन्मित्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.