रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला रस्ता क्रॉस करताना दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात. महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल अशोक साबळे (२० मुळ रा.लांजा सध्या रा.रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माळनाका येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहा नितिन साळवी (३३) व तिची मुलगी रिध्दी नितिन साळवी (११, रा. स्वयंवर मंगल कार्यालय जवळ,रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी नेहा साळवी दुचाकी (क्र. एमएच-०८-एआर-३८८९) वरुन सोबत मुलगी रिध्दी हिला दामले हायस्कुलहून घरी घेउन जात होत्या. त्या माळनाका येथील दुभाजक क्रॉस करुन स्वयंवर हॉलच्या दिशेने जात असताना संशयित राहुल साबळे हा दुचाकीवरुन मित्राला मागे बसवून जयस्तंभ ते मारुती मंदिर असा जात होता. ही दोन्ही वाहने माळनाका येथील दुभाजकाजवळ आली तेव्हा इतर वाहने थांबलेली असतानाही राहुल साबळेने डावीकडून बाजू घेऊन पुढे जाताना साळवी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नेहा साळवी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.