मालवाहतुकीने २ महिन्यात दीड कोटी उत्पन्न

एसटी सेवा ; कोरोना, एसटी बंद काळात मोठा हातभार

रत्नागिरी:- कोरोना काळातील दीड वर्षे आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाच्या पाच महिन्यांमुळे एसटी मोठ्या आर्थिक संकटात आहे. सार्वजनिक एसटी वाहतूक शंभर टक्के सुरू झाली असली तरी एसटीला सावरण्याचे काम एसटीच्या मालवाहतुकीने केले आहे. मालवाहतूक करणाऱ्या ५० ट्रकनी थोडी थोडकी नाही तर गेल्या दोन महिन्यांमध्ये १ कोटी ६४ लाख ६९ हजार एवढे उत्पन्न मिळवून एसटीला मोठा हात दिला आहे.

कोरोना माहामारीचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा मोठा निर्णय शासनाला घ्यावा लागला. यामुळे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये सर्व काही दीड वर्षे ठप्प झाले. याचा एसटी महामंडळावरही मोठा परिणाम झाला. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवल्याने आधीच तोट्यात असलेल्या एसटीचा पाय आणखी खोलात गेला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न एसटीने सुरू केला एवढ्यात एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. एक दोन महिने नाही तर पाच महिने हे आंदोलन चालले. त्यामुळे एसटी सेवा पाच महिने बंद ठेवावी लागली. अखेर न्यायालयाच्या फर्मानानंतर २२ एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरवात झाली. तेव्हापासून एसटी वाहतूक आणि एसटीच्या मालवाहतुकीला पुन्हा गती आली.

रत्नागिरी विभागाकडे मालवाहतुकीसाठी ५० मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. त्या द्वारे एप्रिलमध्ये ४ हजार किलोमीटर मालवाहतुकीमुळे ३ लाख १७ हजार तर मे महिन्यात १८ हजार ५५४ किलोमीटर वाहतुकीमुळे १ कोटी ६१ लाख एवढे उत्पन्न मिळाले आहेत. सिमेंट, साखर, कौले, जांभा दगड, विटा, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कलमे, पत्रे, पाईप, तांदूळ, गहू आदी साहित्यांची वाहतूक एसटीच्या मालवाहतुकीद्वारे करण्यात आली. याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे एसटीने मालवाहतुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.