रत्नागिरी:- मालमत्ता, भूखंड खरेदी करताना नागरिकांना संबंधित जमिनीची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, नोंदणी विभागाला गावांचे नकाशे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना जमिनींची माहिती मिळणार असून, नोंदणी विभागाला चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) ठरवितानाही याचा फायदा होणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि एमआरसॅक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, एक नवे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर एमआरसॅककडून प्राप्त नकाशे अपलोड करण्यात येत आहेत तसेच महापालिका, नगरपालिकांचे विकास आराखडेही जोडण्यात येत आहेत. त्यामध्ये शहरी, ग्रामीण आणि प्रभावक्षेत्रातील जमिनींची विभागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्या जमिनीची माहिती हवी आहे, त्या नकाशावरील कळ दाबल्यानंतर जमिनीची उपलब्ध सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांत अधिक पारदर्शकता येणार आहे. याशिवाय नोंदणी विभागाला दरवर्षी रेडीरेकनर दर जाहीर करताना या संकेतस्थळाची मदत होणार आहे. हे संकेतस्थळ केवळ नागरिकांना माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ नव्या वर्षात जानेवारीमध्ये नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर अचूक स्थान शोधणे आणि चालू बाजारमूल्य आदी विविध माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.