६ कोटींची वसुली पूर्ण; २४ मालमत्ता सील
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेने घरपट्टी वसुलीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी थकवणाऱ्यांच्या शहरातील 24 मालमत्ता सील केल्या असून 25 नळजोडण्या तोडल्या आहेत. पालिकेपुढे 14 कोटीची वसूली करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 6 कोटी 6 लाख 91 हजार एवढी करवसुली झाली आहे.
रत्नागिरी पालिकेच्या हद्दीत सुमारे तीन हजारावर इमलेधारक आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मार्च महिन्यापूर्वी घरपट्टी वसूल केली जाते. घरपट्टी वसुलीचे सुमारे 14 कोटीचे लक्ष्य आहे; परंतु मार्च महिना सुरू झाला तरीही अनेकांनी घरपट्टीच भरलेली नाही. आतापर्यंत 50 टक्केच घरपट्टी वसुली झालेली आहे. वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथके नेमण्यात आली आहेत. अनेकांना नोटिस देऊनही घरपट्टी न भरल्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत.
शहरातील थकीत करदात्यांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत शहरातील एकूण 24 मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. दिलेल्या उद्दिष्टापैकी 50 टक्के करवसुली झाली आहे. वेळेवर घरपट्टी न भरणाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेच्या वसुली पथकाने दिला आहे.