मालगुंडमध्ये कडक लॉकडाऊन; सर्व सीमा बंद

गणपतीपुळे:- मालगुंडमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडू लागल्याने मालगुंडला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमर्यादित दिवसासाठी या ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

मालगुंड गाव म्हणजे पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये बाजारपेठ म्हणून गणला जातो. याच गावामध्ये गेले दोन महिने कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी या गावातील दोन वाड्यांमधील अनेकांना क्वॉरंटाईनसुद्धा करण्यात आले होते. या ठिकाणची कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने मालगुंड हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला असून, अमर्यादित लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

मालगुंडमध्ये प्रत्येक वाडीमध्ये जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून, बाहेरून येणाऱ्या व्यक्तिंना बंदी घालण्यात आली आहे. मालगुंड महावितरण कार्यालय जीवन शिक्षण शाळेपासून भंडारवाड्याकडे जाणारा रोड, समाधान हॉटेल येथील दोन्ही रस्ते बळीराम परकर विद्यालयाजवळील भंडारवाड्याकडे व मराठवाडीकडे जाणारे रस्ते कुंभारवाडा येथील तळेपाटवाडी आदी सर्व वाड्यातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक आरोग्य सेवा सोडल्यास सर्वच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.

दुकाने उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जयगड सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, गणपतीपुळे दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.