रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील मारुतीच्या देवळात शनिवारी पहाटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून दानपेटीतील रोकड लांबवली. विशेष म्हणजे दानपेटीतील मोठ्या नोटांची चोरी झाली असून छोट्या नोटा दानपेटीत तशाच सोडत चोरटा पसार झाला.
मारुती मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पहाटे ३.३० च्या सुमारास ही चोरी झाली आहे. मंदिर परिसरात सीसीटिव्ही यंत्रणा कार्यरत असून या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाल्याची शक्यता आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.