माय-लेकींसह सातजणांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प 

२७ वर्षीय तरुणीसह ७३ वर्षीय आजींचा सामवेश

रत्नागिरी:- प्रत्येकाच्या शरीरात आत्मा असतो, तो अमर असतो. माणसाने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते. एका जन्मात सर्व कर्मभोग संपले नाहीत तर पुनर्जन्म होतो. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करावेच लागतात. ते विधिवत, शास्त्रानुसार झाले नाहीत तर मयताचा आत्मा अतृप्त राहतो,त्याचे दुष्परिणाम त्याच्या कुटुंबाला भोगावेच लागतात अशा सर्व भाकडकथा माणसाचा मनावर पिढ्यानपिढ्या सतत बिंबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या खर्या वाटतात. त्यातून आपण भारतीय बाहेर पडूच शकत नाहीत अशी व्यवस्थाच निर्माण झालेली असताना रत्नागिरीतील माय-लेकींसह सात जणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबीरात त्यांचा या धाडसाचा गौरव करण्यात आला.

मरावे परी किर्तीरुपी उरावे ही खूणगाठ मनात ठेवून शहातील साळवी स्टॉप येथे राहणार्या संपूर्ण देहदानाच्या अंतिम निर्णय घेतला.मानसी रमेश साळूंखे (२७)  त्यांची आई सुवर्णलता रमेश साळूंखे (वय ५०),राजश्री रमेश सोहनी (वय ७३),शैलजा बळवंत केळकर (वय ६७), संदीप डगवेकर (वय ५१) यांच्यासोबत ना. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत व त्यांची पत्नी श्रद्धा सामंत यांनी देखील मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला आहे. 

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज रत्नागिरीत महा आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शेकडो रुग्णांनी आपली आरोग्य तपसणी केली. याशिवाय रुग्णांवर वैद्यकीय उपचार देखील मोफत करण्यात येणार आहेत. याच मेळाव्यात नागरिकांना मरणोत्तर देहदानाचे आवाहन देखील करण्यात आले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत २७ वर्षीय तरुणीपासून ७३ वर्षीय आज्जीपर्यंत अनेकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. या सर्वांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला. 

मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करणार्‍या मानसी साळूंखे म्हणाल्या ईश्वराच्या कृपेने आपल्याला मानवाचा जन्म मिळाला आहे. तसेच आज मी समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या आजारने पीडित लोक बघून मनाला खूप दु:ख वाटते. पीडित लोकांसाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेपोटी व सामाजिक बांधिलकीचे हेतूने मरणोत्तर देहदान करण्याचे ठरवले. जेणेकरून माझ्या पश्चातसुद्धा माझे अस्तित्व पृथ्वीतलावर राहील व गरजू लोकांना त्याचा लाभ मिळेल.

देहदान करण्याची इच्छा माझ्या आईची होती. पण ती दीर्घ अशा कॅन्सरच्या आजाराने पीडित असल्यामुळे ती देहदान करू शकली नाही. याची खंत तिने माझ्याजवळ देह सोडण्यापूर्वी व्यक्त केली होती. तिच्या खंतने मी प्रभावित होऊन मरणोत्तर देहदान करायचे ठरवले. तसेच मी मेडिकल फील्ड मध्ये असल्या कारणामुळे देहदान केल्यामुळे माझ्या शरीराचे अवयवांचा गरजू लोकांना लाभ मिळू शकेल, तसेच मेडिकल कॉलेजला नवनवीन संशोधन करण्यासाठी  त्याचा उपयोग होऊ शकेल. तसेच श्री श्री रविशंकर हे माझे गुरु आहेत. त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे  ह्या हेतून मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतल्याचे सुवर्णलता रमेश साळूंके यांनी बोलताना सांगितले.