रत्नागिरी:- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात जनता दल (से) पक्ष आणि कोकण जनविकास समितीने सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पसरू लागले असून १० एप्रिल रोजी दापोली येथे तर ११ एप्रिल रोजी चिपळूणमध्ये कर्जदार महिलांचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात फसल्या असून यातून बाहेर कसे पडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अटीशर्ती डावलून वारेमाप कर्जवाटप केले आहे. एकाच वेळी आठ-आठ, दहा- दहा कंपन्यांनी एकेका महिलेला कर्ज दिले आहे. त्यामुळे ज्यांचे मासिक उत्पन्न पाच-दहा हजार रुपये नाही, अशा महिलांना दरमहा दहा-पंधरा हजार ते अगदी पंचवीस ते तीस हजारापर्यंत हप्त्यापोटी भरावे लागत आहेत.
घरातील दागिने विकून, जमीन, आंब्याच्या बागा गहाण ठेवून अनेक महिलांनी हप्ते भरले आहेत. पर्याय न राहिल्यामुळे काही महिलांनी मासिक १० टक्के वा अधिक व्याज दराने सावकारी कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते भरले आहेत. त्यामुळे अशा महिला अधिकच अडचणीत आल्या आहेत. सरकारी बँका, सहकारी बँका, पतपेढ्या यांच्या तुलनेत मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्याजाचे दर खूपच अधिक आहेत. याशिवाय साधारण १० ते २५ टक्के रक्कम वेगवेगळ्या नावाखाली कापली जाते, त्यामुळे व्याजदर जास्त पडतो. कर्जाचा हप्ता दर आठवड्याला, पंधरा दिवसाआड असे भरावे लागतात, त्यामुळे महिला कायम विवंचनेत असतात! यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यासारख्या घटनाही घडल्या असून किमान एका महिलेने यात जीव गमावला आहे.
या पार्श्वभूमीवर या महिलांच्या परिस्थितीकडे राज्य सरकार, रिझर्व बँक तसेच स्थानिक पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जनविकास समितीच्या माध्यमातून १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दापोलीतील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय, शिवाजीनगर येथे तर ११ तारखेला चिपळूणमध्ये नगरपरिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप करून कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या हजारो महिलांना त्यातून बाहेर काढावे, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे . यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी जनता दलाचे प्रभाकर नारकर, संजय परब, जगदिश नलावडे, ऍड. प्रशांत गायकवाड कोकण जनविकास समितीचे, सुरेश रासम, नम्रता जाधव, संग्राम पेटकर, दिनेश राणे आदी उपस्थित राहणार आहेत. चिपळूण येथील मेळाव्याला ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी खासदार हुसेन दलवाई हेही उपस्थित राहणार आहेत.