मायक्रो फायनान्सच्या आडून खासगी सावकारी

कंपन्यांवर कारवाईची जनता दलाची मागणी

रत्नागिरी:- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी सावकारी फोफावली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यानी नियमबाह्य आणि महिलांची आर्थिक ऐपत लक्षात न घेता बेसुमार कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे हजारो महिला कर्जाच्या सापळ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी जनता दल यांच्याकडून करण्यात आली आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज दिले आहे. त्या कर्जावरील व्याजाचा दर असुरक्षित कर्ज म्हणून २४ ते ३६ टक्क्यांपर्यंत असतात. त्यामुळे मासिक हप्त्याची रक्कम दहा-पंधरा हजारापासून ३०-४० हजारापर्यंत गेली आहे. कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी कंपन्यांचे एजंट दादागिरी आणि दांडगाईं करीत असतात. अपशब्दांचा वापर, घरात चार-चार तास बसून राहणे, रात्री अपरात्री घरी जाणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत. एजंट पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, याची कल्पना असल्यामुळे घरातील सोनेनाणे, आंब्याच्या बागा गहाण टाकण्याचे प्रकार घडले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी सावकारी फोफावली आहे. यात भयावह आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे सरकारने गावागावातील पोलीस पाटलांच्या माध्यमातून खाजगी सावकारीची माहिती घ्यावी व त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, प्रदेश सचिव संजय परब, जिल्हाध्यक्ष जगदिश नलावडे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते आणि कोकण जन विकास समितीचे सुरेश रासम, नम्रता जाधव, संग्राम पेटकर, दिनेश राणे यांनी केली आहे.