‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहिमेंतर्गत एक लाख महिलांची तपासणी

रत्नागिरी:- नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीला 18 वर्षांवरील मुली तसेच महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरजेनुसार औषधोपचारही केले गेले. एकूण जवळपास 1 लाख महिलांची तपासणी करण्यात आली.

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली असून, त्याची अंमलबजावणी पहिल्या माळेपासून करण्यात आली. फक्त तरुणी व महिलांच्याच आरोग्याची तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न राबविला जात असून, त्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावपातळीवरील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय अशा विविध पातळ्यांवर या तपासण्या केल्या जात आहेत.

या मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद बघता येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य तपासणीमध्ये प्रामुख्याने रक्त, लघवी, हिमोग्लोबिन याबरोबरच मासिक पाळीची अनियमितता, गर्भारपणातील त्रास, रक्तदाब, गर्भाशयातील कर्करोग आदींबाबत तपासणी केली जात आहे. यामध्ये आणखी काही आढळून आल्यास त्याबाबत योग्य तो औषधोपचार तसेच पाठपुरावादेखील आरोग्य विभाग करणार आहे.
मोहिमेसाठी जिल्ह्यातील 9 तालुक्यांत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयी असे 9 ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी शिबिराची व्यवस्था आहे.

जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, दाखल रुणांवर उपचाराची सोय या आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची विविध पथके कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, महिलांच्या बाळंतपणाची व्यवस्था याठिकाणी सज्ज आहे. जिल्ह्यात सुमारे 347 उपकेंद्रे ही दोन किंवा तीन गावे मिळून एक उपकेंद्र अशा प्रकारात आहे. त्यामुळे लगतच्या गावांमधील महिला, तरुणींची तपासणी याठिकाणी केली जाते. मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालय, खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा, राजापूर या उपकेंद्रात ही तपासणी केली जाते. तसेच गावपातळीवर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्यसेविका यांच्यामार्फत महिला व भगिनी यांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी योग्य नियोजन करत एक लाखाचा टप्पा गाठला. या सर्वांवर योग्य उपचार करण्यात आले.