‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जिल्ह्यात 680 पथके नियुक्त

रत्नागिरी:- माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सदस्यांना दिल्या. जिल्ह्यात सुमारे 680 पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे श्री. बने यांनी सांगितले.

अध्यक्ष बने यांनी संवाद साधत सदस्यांसह अधिकार्‍यांनाही महत्त्वाच्या सुचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड हे सहभागी झालेले होते. जिल्हाधिकारी यांनीही काही महत्त्वाच्या सुचना यावेळी केल्या आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना यामध्ये लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावयाचे आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा लोकसंपर्क चांगला असतो. तपासणी प्रसंगी अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सरसावले पाहीजे. आरोग्य तपासणीमध्ये सर्दी, खोकला झालेल्यांवर उपचार केले जाणार आहेत. त्यांची कोरोना तपासणी होणार आहे. त्यावेळी काहीठिकाणी गाव पातळीवर विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्दी, ताप ही कोरोनाची लक्षणे असल्यामुळे ग्रामीण भागात त्याचे गांभिर्य लोकांना नाही. त्यातून गोंधळ होऊ नये आणि आरोग्य विभागाच्या मोहिमेत अडथळा निर्माण होणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग रहावले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. कम्युनिटी स्प्रेड होऊ नये यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. वेळेत उपचार हाच कोरोनासाठी महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येकाची तपासणी झाली पाहीजे यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे अशा सुचना अध्यक्ष बने यांनी दिल्या आहेत.